सकाळी सकाळी गटण्या सायकल हापशित वाचनालयात आला. आपल्या नेहमीच्या जागी सायकल लावून त्यानं वाचनालयात पाय टाकला आणि इतक्यात, अरे ए गटण्या sss म्हणून सखारामला एक सणसणीत हाक ऐकू आली. त्याचबरोबर एक जोरदार छप्पर उडवून जाणारी शिवी छप्पर उडवून गेली. गटण्याला आलम दुनियेत आपल्या बापानंतर जर कोणाची भीती वाटली असेल तर या माणसाची. या माणसाची सलगीतली पाठीवर पडणारी थापपण काही वेळ श्वास घेऊ देत नसे. यांच नाव रावसाहेब. पूर्वी बेळगावात असायचे. सिनेमा-थेटराच्या व्यवसायात मन रमत नव्हत म्हणून आताशा पुण्यात आले होते. या बेळगावी लोण्याला चितळेंच्या बाखरवड़ीचा नाद लावणारे पु.लंच होते.
मराठी नाटकांची प्रचंड हौस आणि शास्त्रीय संगीतावर नितांत प्रेम असलेला हा अजब इसम. या माणसानी एकदा बेळगावात असतांना कुठलासा फॉर्म भरताना आपली मातृभाषा मराठी लिहिल्यावर रावसाहेबांना कुणीतरी विचारलं, “काय हो रावसाहेब, तुमची मातृभाषा मराठी ?” त्यावर रावसाहेब म्हणाले,”आपल्याकडे मराठी नाटकाला गर्दी होते का कानडी रे शिंच्या?, आपल्या गावची भाषा ओळखायची असेल तर दुकानदाराचा फलक कोणत्या भाषेत लिहिलेला असतो ते पहा अन ठरवा ” ह्यांनी बेळगावात दिलेलं हे उत्तर आताशा निम्म्या पुण्याला पाठ झालं होतं. आपल्या थेटराच्या खोलीत दुधभात चित्रपटाची पटकथा लिहीण्याच काम शिक्रेट ठेवणाऱ्या रावसाहेबांना जेंव्हा पु.ल नी यमक म्हणजे काय ते सांगीतल, तेंव्हापासून कॉलेजात मराठी म्हणजे काय शिकवतात याचा थोडासा अंदाज त्यांना आला होता. तेंव्हा शास्त्रशुद्ध भाषा शिकण्याची उर्मी उत्पन्न झाल्यामुळे आपले सिनेमा थेटर विकून रावसाहेब पुण्यात आले आणि ग्रंथालय टाकुन बसले होते.
आताशा रावसाहेबांची भाषा जरी शुद्धतेकडे झुकली असली तरी कानडी भाषेचा आघात आणि तोंडात बसलेल्या शिव्या या काही सुटल्या नव्हत्या. म्हणतात ना,’सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.’ हा माणूस पुण्यातल्या शिव्यांना शिव्या मानत नाही आणि रागात न येता चक्क हसतो हे पाहून सुरुवातीच्या काळात पुणेकरांनी रावसाहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्याचही मी अनेकदा ऐकलय.
आशा रावसाहेबांकडे गटण्या चालत गेला आणि दोन हात दूर उभा राहूनच रावसाहेबांकडे पाहू लागला. सख्याचं अक्षर वळणदार असल्यामुळे रावसाहेब आपल्या कानडी मराठी भाषेत म्हणाले,“ गटण्या परवाच्याला पि.यल. गोष्ट सांगायला येणारेत म्हणून सांगून ठेवतो मी, ते जाहिरातीच बोर्डबिर्ड सगळं कसं मस्त लिहून ठेवायचं हां! बिलकुल खराब दिसलं नाही पाहिजे,नाहीतर उगीचं आपलं काम टाळून ** वर करून पुस्तकं चरत बसायचं आपलं.” गटण्याला रावसाहेबांची आज्ञा डावलणं शक्यच नव्हतं कारण रावसाहेब त्यांच्या कोणत्याच वाचकाला किंवा कर्मचाऱ्याला आठवडयाला तीनपेक्षा जास्त पुस्तक घेऊन जाऊ देत नसत. गटण्याला फ़क्त जितके पाहिजेत तितके पुस्तक घेउन जाण्याची मुभा होती. अर्थात त्याला कारण होतं, सख्याच्या घरी बुक बाइंडिंग च दूकान असल्यामुळं कधी कधी जुन्या पुस्तकांना तो स्वत: पैसे न घेता बाइंडिंग करुन आणायचा. पण हा व्यवहार त्याला समजत नसल्यान रावसाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार असल्याच्या भावनेतुन तो त्यांच ऐकत असे. गटण्यानं बोर्ड लिहिला. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी पु.ल. सभागृहात आले. कथाकथन झालं. पु लं सगळ्यांशी बोलत उभे होते. इतक्यात सखाराम त्यांच्यासमोर आला, पुलंनी सख्याला हाक मारली,“सख्या ss!” गटण्यला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो बोलून गेला,“आपल्यासारख्या सूर्यानं माझ्यासारख्या काजव्यांच स्मरण ठेवणं मला आजन्म उपकृत करणारं आहे.” हे ऐकुन पुलंनी सख्या बदलला नसल्याची त्यांनी खात्री करून घेतली. सरस्वतीनी त्याच्या जीभेवर काढलेला मराठी भाषेचा क्लास अजूनही जोरात सुरू होता हेही पाहून ते मनमुराद हसले. इतक्यात त्यांना कुणीतरी ऑटोग्राफ मागायला म्हणून हाक मारली. खाली एक चिमुरडा मुलगा आपली वही घेऊन उभा होता. गटण्या पि.यल.ना म्हणाला, हा ज्युनियर गटणे. पुलंनी हसत हसत त्याचा पापा घेतला आणि स्वाक्षरी करून दिली.
इतक्यात रावसाहेब पुढे आले , पी. यल. ओss पी. यलं.ज़रा ह्या रजिस्टर वर तुमचा ऑटोग्राफ दया म्हणतंय मी.
पु.ल. रावसाहेबांना म्हणाले,” काय हो हे, रावसाहेब ? तुम्ही अगदी प्रोफेशनल झालात बरं का …! ”
आपल्या अस्सल कानडी आघतात रावसाहेब म्हणाले,” पि.यल. , हे बघा, ते परवा दुसऱ्या वाचनालयात जाऊन आलो तर तिथ अस रजिस्टर पाहिलो, अन ठरवुनच आलो बघा अस आपण करायच म्हणुनं ”
अन पुढे सांगत होते, अहो तुम्हाला सांगतो पि.यल. आताच्या वाचणाऱ्यात अन लिहिणाऱ्याच्या हातात अन xxx काही दम उरल नाही बघा, काय हो ते चेतन भगत म्हणतय मी निव्वळ पिच्चरच्या श्टोऱ्या लिहितय की हो ते अन कित्ती घाण हो छी sss छी sss छी sss …”
पु.ल. रावसाहेबांच्या बोलण्याला ऐकुन हसले आणि सही करत करत म्हणाले, पोरं नवीन आहेत रावसाहेब त्यांना वाटणारे विषय, विचार नव्या पद्धतीनं मांडणारच ते. आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना, नाही का? आता पुलं, वपु, आणि इतर असंख्य साहित्यिकांच्या मांदियाळीत राहायला आल्यापासून रावसाहेबांना लिहिण्या वाचण्यात जपावा वाटणारा कुलाचारच निराळा होता त्याला कोण काय करणार? चर्चा झाल्या, कार्यक्रम संपला, लेडी शितारिष्ट असलेली रावसाहेबांची मोटार वाचनालयाच्या दारासमोर आली, पुलं बसले, मोटार आवाज करत निघून गेली.
पुलं आले, पुलं गेले, मागे उरले ते फक्त रावसाहेब, गटण्या आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलेल्या गोष्टी.
आजही कोणत्या वाचनालयात गेलो तर नजर भरभर पुस्तकावरून फिरते, कुठेतरी पुलं सापडतात, अधाशासारखा त्यांना परत एकदा वाचतो. त्यांच्या पात्रांना कडकडून मिठी मारतो. आणि त्यांच्या आठवणीत निपचित झोपतो. आजोबांच्या गोष्टी नंतर लहान मुल झोपत तसं.
– भार्गव