Tuesday, 28 November 2017

अनंता तुला कोण पाहू शके ..

बाकीबा उर्फ बा. भ. बोरकर यांनी लिहिलेल्या अनेक काव्यपुष्पांपैकी एक अमरत्वाचं वरदान असलेलं काव्यपुष्प म्हणजे अनंता तुला कोण पाहू शके. आणि या पुष्पाचा मनाला भारावून टाकणारा गंध म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांच्या गायकीतून या शब्दांवर चढवलेला स्वरसाज.  तीच आर्तता कुठेतरी मनाला भिडून गेली केतकीच्या आवाजातून


अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो

- बा. भ. बोरकर 
- पं. जितेंद्र अभिषेकी 



  

अंधाराचे भय जयाला ...

अंधाराचे भय जयाला, साद न घालू शकतो तो
ज्याला साथ अंधाराची, वाट आक्रमित जातो  तो

वळून मागे पहात असता, मार्ग प्रकाशित दिसतो जो
सूर्य पेटवित चालत असतो, विचार मागे उरतो जो

ओढ मला अंधाराची, प्रकाशेच्छाही धरतो कोण ?
चरणाशी जो विचार येतो, आज्ञा माझी पुसतो तो

मग एकच आज्ञा होते, उजळवण्याची चराचराला
साथ प्रिय जरी अंधाराची, खिडकीपाशी सूर्य थांबला

मिटून डोळे नंतर मीही, अंधार माझ्या आत दडवला
पराजित मग तेजोनिधीही, संध्याकाळी घरी परतला

घरात येऊन संध्याकाळी, मीही शोधतो दुःखाला
शब्दरूपाने कविता बनुनी, दुःख बिलगते हृदयाला

कधी सापडे हात आईचा, कधी स्पर्शही प्रेयसीचा
कधी वाटे ही मुलगी माझी, कधी आधार बहिणीचा

कधी डोळ्यातील अश्रू सुद्धा चुंबून घेती धरतीला 
दुःखाचा गंधही मग, मृदगंधासम  दरवळला

सृजनाच्या अंधार रात्री, कळा भोगतो प्रसृतीच्या
आधार बापाचा असला तरी, वेदना हव्याशा मातृत्वाच्या ...


- भार्गव हिरवे





Monday, 13 November 2017

लपवले नाव त्यांचे ...

लपवले नाव त्यांचे जखमांतुनी मी
कवटाळले कैक घावही उरी मी

भेसूर रुपास घाबरलो जयांच्या
त्यांचेच मुखवटे दडवले उरी मी

विक्षिप्त वागण्याची तर्हा काय सांगू
आक्षेपही जरासे नोंदवले उरी मी



- भार्गव 

Saturday, 11 November 2017

श्यामराजपंत ...

मी घराचं लोटलेलं दार हळूच ढकललं, पंतांना भेटायची ईच्छा होती, पण पंतांचा डोळा लागल्याचं माझ्या लक्षात आलं म्हणून मग आवाज न करताच निघालो तेवढ्यात पंत ओरडले आणि मी थबकलो. 

हरामखोर चल चालता हो इथून ... ! निघ पाहू ... 
अंथरुणात पडलेले श्यामराजपंत मोठ्यांदा ओरडले. मोठ्या लगबगीनी पण तरीही काठी टेकवत टेकवत माई बाहेर आल्या आणि श्यामराजपंतांच्या उशाशी बसून, त्यांचा हात आपल्या हातात घेत, हळुवार दाबत, विचारत्या झाल्या, "अहो ! काय होतंय ? हे घ्या थोडंस पाणी प्या." 
माईंच्या या बोलण्यानी थोडसं भानावर येत श्यामराजपंतांनी माईंच्या हातातलं फुलपात्र पडल्या पडल्याच ओठांना लावलं, जेमतेम ओठ ओले केले, आणि बसं म्हणून हात केला. 
मग आपल्या हातातलं फुलपात्र बाजूला ठेवून, "आता आराम करा!" म्हणत माई उठल्या, मला बसायची खूण करून आपण परत आतल्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या, एकीकडे गणपतीच्या नावाचा जप सुरूच होता. खरंतर मागच्या कित्येक वर्षांपासून माई कामाव्यतिरिक्त एकही शब्द कुणाला बोलल्या नव्हत्या. फक्त गणपतीचं नाव त्यांच्या तोंडातून येणार जाणारा प्रत्येकजण ऐकायचा. माई आत गेल्या. श्यामराजपंत परत एकदा आढ्याकडे डोळे लावून बसले, नकळत डोळ्यात पाणी आलं, छताला लावलेला फॅन आणि त्याला चिकटलेलं जाळं हळूहळू धूसर होत गेलं. मनात जपून ठेवलेली आठवणींची पानं परत एकदा फडफडली आणि श्यामराजपंत सांगू लागले, 

अरे ... ! तुझ्याच वयाचा होतो, कॉलेजात शिकायचो, माझे वडील रघुनाथपंत कुलकर्णी उर्फ अण्णा म्हणजे गावातलं बड प्रस्थ. आमच्याकडे पन्नास एकर ओलीताखालची शेती होती,  गावात भला थोरला वाडा होता, जवळ जवळ पाचशे चौरस फूटाची ओसरी होती, घरात कामाला गडी माणसांची वर्दळ असायची,  पंचवीस म्हशी , दहा  गाई आणि आठ बैल येवढं जनावर दावणीला होतं. दररोज धोंडिबा गाईच्या शेण-पाण्याचा सडा टाकायचा, मैनी त्यावर रांगोळी काढायची. वाड्यासमोरच्या अंगणात तुळशी वृंदावन होतं, अक्का सकाळी दररोज तुळशीला पाणी घालायची. मग तोंडात स्तोत्र आणि कुकरच्या शिट्टीचा आवाज घरभर घुमायचा. घरात दोन कुत्रे पाळलेले होते, त्यांच्या भुंकण्यानी, गोठ्यातून हंबरणाऱ्या गाई म्हशीच्या आवाजानी आणि शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटानी प्रत्येक पहाट गजबजून जायची. 

अण्णांना गावातले सगळेजण मानायचे, कोणाच्याही अडीअडचणीला आर्ध्यारात्री सुद्धा अण्णा हजर असायचे. गरजू माणसाला मदत करण्यासाठीच जणू अण्णांचा जन्म झालेला. कोणावरही पटकन विश्वास टाकून मोकळा होणारा त्यांचा स्वभाव होता. हे माहीत असल्यानं अक्काला त्यांच्या व्यवहारातही सारखं लक्ष द्यावं लागायचं. माणूस कितीही स्वच्छ मनाचा असला तरी अजातशत्रुत्वाला एकप्रकारची लागणारी चतुराई अण्णांकडे नव्हती. एखाद्याला आपलं म्हणलं की अगदी कंबरेची लंगोट काढून देण्याइतकी त्यांची तयारी असायची. आमचे दाजी म्हणजे आमचे आजोबा निरक्षर होते त्यामुळे त्यांनी मालमत्तेची कागदपत्र पाहायची जबाबदारी त्यांचे मित्र आनंदराव देशपांडे यांच्यावर सोपवलेली होती. जेंव्हा अण्णांनी घराचा कारभार पाहायला सुरुवात केली तेंव्हाही आनंदरावांनी मालमत्तेची कागदपत्र सांभाळली नंतर दोन पिढ्यांच्या विश्वासावर मीही घरोब्याचे संबंध असेच राहावेत या हेतूनी आनंदरावांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विश्वासराव देशपांड्यांकडेच कागदपत्रांची जबाबदारी राहू दिली. एक दिवस विश्वासराव देशपांडे आले, त्यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी काही सह्या मागितल्या, अण्णा अजून काही जमीन खरेदी करणार आहेत हे माझ्या कानांवर आलेलं होतं त्यामुळे मी विश्वासरावांजवळ फारशी चौकशी न करता अण्णांकडे पाठवून दिलं.  माझं लग्न झालेलं होतं आणि घरातले बरेचसे व्यवहार मी पाहात असलो तरी अंतिम निर्णय आणि सह्या या अण्णाच करत असत.  शेवटी विश्वासरावांवर विश्वास ठेवून अण्णांनी कागदपत्र न वाचताच सांगितल्या ठिकाणी सह्या केल्या, आणि घात झाला !

पहाता पहाता विश्वासरावांनी आमच्या विश्वासाला तडा दिला. आणि सगळ्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या. या धक्क्यानी अण्णांनी जागीच जगाचा निरोप घेतला. विश्वास आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलेलो, एकत्र खेळलेलो त्याच्या अशा वागण्यानं मला प्रचंड राग आला आणि ... 

संताप आणि चिडचिड झाली, विश्वासनी केलेल्या गोष्टीचा जाब विचारायला म्हणून मी निघालो, इतक्यात तो माझ्या दारात उभा दिसला, चडफडाट होऊन मी त्याला हरामखोर चल चालता हो इथून ! निघ पाहू ...  म्हणून ओरडलो, तो माझ्याकडे पाहून हसला त्यामुळे अजून संताप संताप होऊन त्या संतापाच्या भरात मला अर्धांगवायूचा झटका आला. माझी बायको सगुणा म्हणजे तुझी माई , अक्का, धोंडिबा , मैनी माझ्याकडे धावले. पुढे उपचार सुरु झाले, अक्कांनी धोंडिबा आणि मैनीला त्यांची ईच्छा नसतांना जवळजवळ हाकलून लावलं. उरलेला वाडा, दावणीची जनावरं आणि अंगावरचे दागिने विकून अक्का आणि माईंनी आलेल्या पैशातून या मुंबापुरीत चाळीतलं दोन रूमचं घर घेतलं. चार वर्षांपूर्वी अक्कानीही जगाचा निरोप घेतला. आता काही रक्कम बँकेत जमा आहे  त्याच्या व्याजावर जगत आहोत. 

डोळ्याच्या कडांवरून अश्रू ओघळत होते, श्यामराजपंत डोळे पुसण्यासाठी हात डोळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करत होते पण जमत नव्हतं.  प्रयत्न करूनही माणसाला आपले अश्रू आपल्या हातांनी पुसता येऊ नयेत, केवढी ही दैवाची क्रूर चेष्टा असं कुठेतरी माझ्या मनाला वाटून गेलं.  शेवटी मी त्यांचे अश्रू पुसले, ते पाहून ते हसले, त्या हसण्यात असाह्यता, हतबलता होती, दुसऱ्याची नको वाटणारी मदत होती. ते हसणं त्या वेळी मला इतकं चटका लावून गेलं, वाटलं की या माणसानं अजून अश्रू ढाळले तर बरं पण त्याचं हसणं नको. 
शेवटी कारच्या काचेवरचं वायफारनी दूर केलेलं पाणी क्षणभर दूर व्हावं आणि परत पावसानी समोरचं चित्र धूसर करावं तसे श्यामराजपंतांचे डोळे भरून आले.  बालवाडीत नाही का वर्गमित्र किंवा दुसरे मुलं रडायला लागले की आपणही रडायचो तसेच माझेही डोळे भरून आले. 

इतक्यात आतून माईंच्या काठीचा आवाज ऐकून मी माझे डोळे पुसले, पहातो तर पंतांनी सुद्धा विज्ञानाचे सगळे नियम मोडीत काढत डोळ्यातुन बाहेर पडायला अधीर असणाऱ्या सगळ्या अश्रूंना डोळ्यात बेमालूम दडवलं. माई माझ्याकडे पाहून हसल्या, थरथरत्या आवाजात बरा आहेस ना ? म्हणत बसण्याची खूण करत घराच्या बाहेरच्या कठड्याजवळ गेल्या. 

मी आश्चर्यानं श्यामराजपंतांना विचारलं, डोळ्यातलं पाणी दडवलत कसं ? पंत म्हणाले, आता एवढंच काय ते करू शकतो. तिला माझ्या डोळ्यातली आसवं पाहून सुरुवातीच्या काळात आसवं ढाळताना पाहीलयं मी, आता तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये परत म्हणून एवढं करतोच. इथं मला प्रेमाचा नवा रंग उठून दिसला, शेवटी निघतो पंत म्हणत मी हळुवार त्यांचा हात हातात घेतला, पापण्यांची उघडझाप करून त्यांनी मला संमती दिली. मी बाहेर पडलो माई कठड्याजवळ उभ्या होत्याच त्यांच्या पाया पडलो आणि वर उठलो तेंव्हा , माईंच्या तोंडावर हास्य आणि डोळ्याच्या कडा ओल्या होत्या, एकही शब्द न बोलणारी माईंची चर्या बरंच काही सांगून गेली. परत एकदा निःशब्द होऊन मी तिथून निघालो .  

- भार्गव हिरवे 

Monday, 6 November 2017

प्राणप्रिय हंसध्वनी ...

बऱ्याचदा गाण्यापासून राग लक्षात रहातो. अर्थात, जे शास्त्रीय गायन शिकतात त्यांच्या लक्षात हेच राग त्या रागाच्या आरोह - अवरोह , त्यातल्या खयाल आणि बंदिशींमधून लक्षात रहात असतील.
पण मला मात्र हंसध्वनी रागाच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली ती आर्या आंबेकरनी गायलेल्या युवती मना दारुण रण या नाट्यगीताला ऐकल्यावर आणि त्यानंतर परीक्षक म्हणून बसलेल्या शंकर महादेवन यांनी गायलेल्या छोट्याशा भागातून.

हा राग वेळेच्या ओघात हृदयाच्या कोपऱ्यात दडून बसला आणि त्याची परत भेट झाली ती गायक रशीद खान साहेबांच्या 'लागी लगन सखी पती संग ' या बंदिशीला ऐकत असतांना. 
प्रत्येक वेळी ठरवतो, या रागाची शास्त्रीय बाजू समजून घ्यावी म्हणून, पण राग आठवला की तो ऐकायला कान व्याकुळ होतात, मग तो ऐकायचाच, मग कसली शास्त्रीय बाजू आणि कसलं काय ? तो मनाचा ठाव घेत जातो, आजूबाजूच विस्मरण होत जातं, एका अलौकिक जगात हा राग मला घेऊन जातो. माझा म्हणून असलेला 'मी'पणा क्षणांत बाजूला पडतो.

आताच काही दिवसांपूर्वी अजून एक खजिना सापडलाय तो म्हणजे, गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेलं 'लगन बीन जागे ना निर्मोही' कबीर भजन आणि youtube वर मिळालेली ही बासरीची धून. 


गायिका अश्विनी भिडे देशपांडे 



प्राणप्रिय हंसध्वनी - बासरी धून 

खरचं भारतीय शास्त्रीय संगीतातलं माझ्यासारख्या ज्याला गाण्यातलं र ट प कळत नाही अशा माणसाला इतकं भारून टाकू शकतं तर गाण्यात आकंठ बुडून गेलेल्या लोकांना हे अमृतासम नव्हे अमृतच वाटतं यात नवल वाटण्याची गरज नाही. सुखदु:खाच्या, चंचल, शांत, अस्वस्थ करून टाकणाऱ्या, भारावून टाकणाऱ्या कितीतरी भावना, शब्दांच्या पल्याड असलेल्या रंगांची उधळण भारतीय शास्त्रीय संगीतच लीलया करू जाणे. 

- भार्गव हिरवे 

Sunday, 5 November 2017

ती सध्या काय करते ?


बेफाट कथानक, दर्जेदार चित्रीकरण, उत्कृष्ट गीतं, अप्रतिम अभिनय आणि कॉलेज मधल्या पोरांच्या मनाचा, सद्यपरीस्थितीचा अगदी अचूक वेध घेणारा चित्रपट म्हणजे ती सध्या काय करते ? 

या चित्रपटाचं यश कुठयं हे मी माझ्या अनुभवावरून सांगायचं ठरवलं तर, याचं यश मी मला परत जागेवर खेचून आणणाऱ्या आणि मनाचा ताबा घेणाऱ्या कथेला देईल. कारण असे अनेक प्रसंग आहेत की जिथं वाटतं की आता कथेत फालतुगिरी सुरु होणार आणि असं वाटत असतांना कथा झटकन वेगळा टर्न  घेते. जसं तो पत्र पाठवतांनाचा किस्सा, आर्याची गाडी घेऊन जाणारा आणि वेळेत न परतणारा अभिनय, बऱ्याचदा वाटतं आता रडारड तीच घिसीपिटी बॉलीवूड मधली प्रेमकथा सुरु होणार पण तसं नं होता, फिसकटायला खूप वाव असतांना जी अचूक गाडी नेलीये आणि रेस जिंकलीये त्यासाठी पहिल्यांदा वाह ! 

कथा बऱ्याच ठिकाणी अस्वस्थ करते, माझ्यासारख्या ज्याला दुसऱ्याचं दुःख पहावत नाही त्याला दोन अडीच तासांचा चित्रपट पहायला पाच तास लागले पण मी चित्रपट पूर्ण पाहिला.
या चित्रपटाचं यश त्या माझ्या पाच तासात आहे. अनेक वेळा बंद केलेला लॅपटॉप परत सुरु करून मी हा चित्रपट पहायलाय.

पहिल्यांदा वाटलं की मला हे दुःख, त्रास सगळं कथेच्या संवादातून जाणवतंय. पण या कथेची, चित्रपटाची दुःखाची मनाला हुरहूर लावणारी नस ही between the lines समजून घेण्याची आहे. लाल टी-शर्ट घालून जाणारा अंकुश, कॅफे मध्ये तेजश्रीचं "मी जुन्या आठवणीत रमत नाही" म्हणण, बायकोला लाल रंगाच्या शर्टची कहाणी बनवून सांगतांना कुठंतरी वाटणारी भीती, "तिला कळलं तर ?" वाली फिलिंग, काय बोलू , कसं बोलू , मनात साचून राहिलेलं दुःख, भावना त्यांना व्यक्त होण्यासाठी न सापडणार मार्ग हे सगळं, अगदीच सुंदर मांडलंय, आई गं ... कित्ती सुंदर !

आधीपासूनच आर्याच्या रुपातुन वावरणारी अगदी समंजस असलेली तन्वी जेंव्हा तेजश्री प्रधान बनून  त्या अन्या उर्फ़ अंकुश चौधरी सोबत गच्चीवर बोलते, तो तिथ रंगवलेला क्षण अगदी क्या बात ! असा आहे.

खरचं नसतात हो शब्द, काही गोष्टींच कौतुक करायला, तिथे डोळे आणि मौनाची भाषाच  समजावी लागते, तो कट्यार काळजात घुसली मधला सदाशिव म्हणतो ना तसं, टाळ्यापेक्षा स्तब्ध, निशब्द करून टाकणारी शांतताच काही गोष्टींसाठी खरी दाद असते. तशीच दाद या सतीश राजवाडे दिग्दर्शित "ती सध्या काय करते ?" या चित्रपटासाठी ...


- भार्गव

टिप : 
1. दारू वाईट असते, तिच्यानी माणसं दुरावतात.
2.हा लेख चित्रपट मनापासून आवडल्याची पावती आहे. हा समीक्षा करण्याच्या हेतूनी काय चूक काय बरोबर यासाठी लिहिलेला लेख नाही.  

Saturday, 4 November 2017

हिंदी उर्दू च्या संगमावरून ... - भार्गव हिरवे

हिंदी और उर्दू जहाँ एक दुसरे से मिलती है
मेरी यादें खुबसूरत नगमोंसे होकर गुजरती है 

मै सोच में पड़ जाता हूँ हर बार, जब भी 
मुहब्बत और प्यार में से एक को चुनने की बारी आती है 

जज्बात तो आखिर एक हि है  फिर भी, बुरा लगता है  
जब माँ और वतन में से एक को चुनने की नौबत आती है  

-------------------------------------------------------------------------------------------------

पता नहीं क्यूँ ? मै अपने जज्बातोंको बहने देता हूँ 
वक़्त से पहलेही दर्द महसूस करने की इजाजत दे देता हूँ 

वो जख्म खिलकर महकने लगते है फिर दिल में 
तब मै मेरे अशकोंको छलकने की इजाजत दे देता हूँ 

--------------------------------------------------------------------------------------------------

क्यूँ ? हर जीते हुए पल में मुझे मौत नजर आती है 
जिंदगी और मौत की प्यारभरी दास्ताँ मुझे बड़ी भाति है  

कमबख्त ये साथ नहीं छोड़ते  एकदूसरे का कभी
बस यही बात की कमी मुझे इन्सानोमें नजर आती है 

-------------------------------------------------------------------------------------------------

मौत की खूबसूरती देखने हर रात सोता हूँ
जब सच्चाई के करीब होता हूँ आँखे खोल देता हूँ

शायद वहाँ पर भी मौत हैसियत देखती है
मुझ जैसोंको दर्द को नगमोंमें बदलने का काम देती है



Thursday, 2 November 2017

शिवचरित्र



म्यान तलवारी उसळल्या, गरजले राजे शिवाजी
चैतन्ये स्फुरण पावले रायरेश्वरी येसाजी बाजी

मुलुख टीचभर होता, केली अयोध्या पुण्याची 
शककर्ता जन्माला जयावर, धन्य शिवनेरीची माती 

उतरला तो चांदतारा, चढल्या भगव्या ध्वजाही
प्रत्येक भगवा रचित होता, फत्तरे स्वराज्याची 

खजिन्यास येथे ददात नव्हती, भक्तीची शौर्याची
माणिक मोती स्वराज्यातील, मदारी अन वीर तानाजी   

किल्ले सिंहगड, रायगड, प्रतापगडाची थोर महती
यमसदनी धाडिले येथे उदेभान, मोरे, अफजल आदी 

धाक तो शाह्यांस बसवला, आदिल अन कुतुबशाहासी   
डच, वलंदाज, इंग्रज मावळयास बिचकून असती 

घेरा पन्हाळ्यास पडता, निघाला शिव विशाल्यासी 
काशीद देई आत्महुती, घोडखिंड पावन करे बाजी  

बोटे छाटली गेली जेंव्हा, शास्तास शास्त झाली 
ससैन्य पोचले कोंढगडी,  रिपूस दिसती जळत्या मशाली

सुरत बदसुरत बनली, दिल्लीपती औरंगशहाची 
आग्र्यातुन सुटले शिवाजी अन वाट धरली दक्षिणेची 

स्वयम येती गागाभट्ट, करण्या राज्याभिषेक शिवासी 
बसे पायरीस युवराज शंभू, ज्यास रुद्रावतार म्हणती   

प्रतिपदेचा चंद्र वाढता, गरजे जय श्री शिवछत्रपती 
छत्र चामरे घेउनी उभे, अष्टप्रधान सभास्थानी 

कौतुके पाहे मा जिजाऊ , आरूढ पुत्र सिंहासनासी 
झाली असे प्रतीज्ञापुर्ती, स्थापना झाली स्वराज्याची 


©भार्गव हिरवे 

Popular Posts