जरा जास्तच लेट आहे पण अगदी थेट आहे ...
बऱ्याचदा कंटाळा आला, काही चांगलं पाहावंसं वाटलं की, माझे हात आपोआप YouTube वर जातात आणि विनासंकोच मी मराठी चित्रपट सर्च करून वाटेल तो चित्रपट अगदी त्याबद्दलच्या प्रतिक्रिया न वाचता पहातो कारण एकच, ते म्हणजे मराठी चित्रपट पाहिल्यावर आपण वेळ वाया घातला असं कधी वाटत नाही.
कालसुद्धा तसंच झालं, कंटाळलो होतो, नेहमीप्रमाणे सर्च केलं. 'लग्न पाहावे करून' हे शिर्षक असलेला चित्रपट दिसला. त्यातल्या त्यात मुक्ता बर्वे, उमेश कामत, तेजश्री प्रधान, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखी स्टारकास्ट म्हटल्यावर चित्रपट उत्तम असणार याबाबत शंकाच उरली नव्हती. कारण, मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई, उमेश कामतचा टाईम प्लिज, तेजश्री प्रधानचा आत्ताच येऊन गेलेला TSKK , आणि सिद्धार्थचा क्लासमेट हे सगळे चित्रपट पाहून झालेले होते. यांच्या अदाकारीने यांची एक वेगळी इमेज तयार झाली होती. पण कधीकधी सगळे उत्तमातले उत्तम पदार्थ एकत्र करून बनवलेली डिश पण आवडत नाही तसंच या चित्रपटाचं झालं.
स्टारकास्ट उत्तम, अभिनयात सगळेच उजवे, पण एक झालं की, गोष्ट काळजाला भिडलीच नाही, सुरुवातीला मुक्ताला जाड्या आणि त्याच्या मशीनला उमेशच्या सांगण्यावरून उपदेशाचे डोस पाजताना दाखवलंय, त्यात एकमेकांशी भांडण्याव्यतिरिक्त ते दोघं काहीच करत नसतांना व्हिडीओ क्लिप वगैरे च ज्ञान उगीच त्या आदिती नावाच्या पात्राच्या तोंडात कोंबलंय. कॉफीशॉपमध्ये भांडणाऱ्या त्या जाड्याचा आणि पोरीचा रोल नेमका कळाला नाही, अगदी जिथं काहीच वर्कआउट होत नाहीये तिथे त्यांना कुठेतरी किल्ल्या देण्याच्या बहाण्याने दोन वाक्यात गुंडाळल्यासारखं वाटतंय. तो पहिल्यांदा म्हणून घाबरत आलेला मुलगा नंतर चित्रपटात कुठेच दिसला नाही. शुभविवाह संस्थेतलं पहिलं लग्न दाखवतांना तेजश्री आणि सिद्धार्थ यांना स्वतंत्रपणे कथेत आणायला हवं होतं. ते न होताच त्यांना डायरेक्ट डार्करूममध्ये दाखवलं. मध्यरात्री मुक्ता तेजश्रीला लग्नाच्या पहिल्या रात्री फोन करते हे पाहून कल्पकतेची किव आली. पत्रिका जुळत नाही त्यामुळे होणारे वाद दाखवण्याच्या नादात त्या दोघांमधली केमिस्ट्री बिघडवली पण तीही इतकी धावती की अगदी काय काय दाखवू आणि काय काय नको अशी गडबड यातून झालेली दिसली. अगदी शेवटी सस्पेन्समध्ये ठेवलेलं आदिती टिळक उर्फ मुक्ताचं आयुष्यही चित्रपटाला अर्थ देऊ शकलं नाही.
त्या भविष्य बघून, पत्रिका बघून लग्न जुळवणाऱ्या बाईच्या दुकानासमोर परत एकदा शुभविवाह चा लागलेला बोर्ड पाहायला आवडलं असतं पण तेही नाही. अगदी हीच संकल्पना दोन पात्र कमी करून दोघांवरचं चित्रित करता आली असती, कदाचित कथेला अजून चांगला न्याय देता आला असता असं वाटतं.
- भार्गव हिरवे

No comments:
Post a Comment