Tuesday, 28 November 2017

अंधाराचे भय जयाला ...

अंधाराचे भय जयाला, साद न घालू शकतो तो
ज्याला साथ अंधाराची, वाट आक्रमित जातो  तो

वळून मागे पहात असता, मार्ग प्रकाशित दिसतो जो
सूर्य पेटवित चालत असतो, विचार मागे उरतो जो

ओढ मला अंधाराची, प्रकाशेच्छाही धरतो कोण ?
चरणाशी जो विचार येतो, आज्ञा माझी पुसतो तो

मग एकच आज्ञा होते, उजळवण्याची चराचराला
साथ प्रिय जरी अंधाराची, खिडकीपाशी सूर्य थांबला

मिटून डोळे नंतर मीही, अंधार माझ्या आत दडवला
पराजित मग तेजोनिधीही, संध्याकाळी घरी परतला

घरात येऊन संध्याकाळी, मीही शोधतो दुःखाला
शब्दरूपाने कविता बनुनी, दुःख बिलगते हृदयाला

कधी सापडे हात आईचा, कधी स्पर्शही प्रेयसीचा
कधी वाटे ही मुलगी माझी, कधी आधार बहिणीचा

कधी डोळ्यातील अश्रू सुद्धा चुंबून घेती धरतीला 
दुःखाचा गंधही मग, मृदगंधासम  दरवळला

सृजनाच्या अंधार रात्री, कळा भोगतो प्रसृतीच्या
आधार बापाचा असला तरी, वेदना हव्याशा मातृत्वाच्या ...


- भार्गव हिरवे





No comments:

Post a Comment

Popular Posts