Monday, 6 November 2017

प्राणप्रिय हंसध्वनी ...

बऱ्याचदा गाण्यापासून राग लक्षात रहातो. अर्थात, जे शास्त्रीय गायन शिकतात त्यांच्या लक्षात हेच राग त्या रागाच्या आरोह - अवरोह , त्यातल्या खयाल आणि बंदिशींमधून लक्षात रहात असतील.
पण मला मात्र हंसध्वनी रागाच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली ती आर्या आंबेकरनी गायलेल्या युवती मना दारुण रण या नाट्यगीताला ऐकल्यावर आणि त्यानंतर परीक्षक म्हणून बसलेल्या शंकर महादेवन यांनी गायलेल्या छोट्याशा भागातून.

हा राग वेळेच्या ओघात हृदयाच्या कोपऱ्यात दडून बसला आणि त्याची परत भेट झाली ती गायक रशीद खान साहेबांच्या 'लागी लगन सखी पती संग ' या बंदिशीला ऐकत असतांना. 
प्रत्येक वेळी ठरवतो, या रागाची शास्त्रीय बाजू समजून घ्यावी म्हणून, पण राग आठवला की तो ऐकायला कान व्याकुळ होतात, मग तो ऐकायचाच, मग कसली शास्त्रीय बाजू आणि कसलं काय ? तो मनाचा ठाव घेत जातो, आजूबाजूच विस्मरण होत जातं, एका अलौकिक जगात हा राग मला घेऊन जातो. माझा म्हणून असलेला 'मी'पणा क्षणांत बाजूला पडतो.

आताच काही दिवसांपूर्वी अजून एक खजिना सापडलाय तो म्हणजे, गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेलं 'लगन बीन जागे ना निर्मोही' कबीर भजन आणि youtube वर मिळालेली ही बासरीची धून. 


गायिका अश्विनी भिडे देशपांडे 



प्राणप्रिय हंसध्वनी - बासरी धून 

खरचं भारतीय शास्त्रीय संगीतातलं माझ्यासारख्या ज्याला गाण्यातलं र ट प कळत नाही अशा माणसाला इतकं भारून टाकू शकतं तर गाण्यात आकंठ बुडून गेलेल्या लोकांना हे अमृतासम नव्हे अमृतच वाटतं यात नवल वाटण्याची गरज नाही. सुखदु:खाच्या, चंचल, शांत, अस्वस्थ करून टाकणाऱ्या, भारावून टाकणाऱ्या कितीतरी भावना, शब्दांच्या पल्याड असलेल्या रंगांची उधळण भारतीय शास्त्रीय संगीतच लीलया करू जाणे. 

- भार्गव हिरवे 

No comments:

Post a Comment

Popular Posts