Sunday, 5 November 2017

ती सध्या काय करते ?


बेफाट कथानक, दर्जेदार चित्रीकरण, उत्कृष्ट गीतं, अप्रतिम अभिनय आणि कॉलेज मधल्या पोरांच्या मनाचा, सद्यपरीस्थितीचा अगदी अचूक वेध घेणारा चित्रपट म्हणजे ती सध्या काय करते ? 

या चित्रपटाचं यश कुठयं हे मी माझ्या अनुभवावरून सांगायचं ठरवलं तर, याचं यश मी मला परत जागेवर खेचून आणणाऱ्या आणि मनाचा ताबा घेणाऱ्या कथेला देईल. कारण असे अनेक प्रसंग आहेत की जिथं वाटतं की आता कथेत फालतुगिरी सुरु होणार आणि असं वाटत असतांना कथा झटकन वेगळा टर्न  घेते. जसं तो पत्र पाठवतांनाचा किस्सा, आर्याची गाडी घेऊन जाणारा आणि वेळेत न परतणारा अभिनय, बऱ्याचदा वाटतं आता रडारड तीच घिसीपिटी बॉलीवूड मधली प्रेमकथा सुरु होणार पण तसं नं होता, फिसकटायला खूप वाव असतांना जी अचूक गाडी नेलीये आणि रेस जिंकलीये त्यासाठी पहिल्यांदा वाह ! 

कथा बऱ्याच ठिकाणी अस्वस्थ करते, माझ्यासारख्या ज्याला दुसऱ्याचं दुःख पहावत नाही त्याला दोन अडीच तासांचा चित्रपट पहायला पाच तास लागले पण मी चित्रपट पूर्ण पाहिला.
या चित्रपटाचं यश त्या माझ्या पाच तासात आहे. अनेक वेळा बंद केलेला लॅपटॉप परत सुरु करून मी हा चित्रपट पहायलाय.

पहिल्यांदा वाटलं की मला हे दुःख, त्रास सगळं कथेच्या संवादातून जाणवतंय. पण या कथेची, चित्रपटाची दुःखाची मनाला हुरहूर लावणारी नस ही between the lines समजून घेण्याची आहे. लाल टी-शर्ट घालून जाणारा अंकुश, कॅफे मध्ये तेजश्रीचं "मी जुन्या आठवणीत रमत नाही" म्हणण, बायकोला लाल रंगाच्या शर्टची कहाणी बनवून सांगतांना कुठंतरी वाटणारी भीती, "तिला कळलं तर ?" वाली फिलिंग, काय बोलू , कसं बोलू , मनात साचून राहिलेलं दुःख, भावना त्यांना व्यक्त होण्यासाठी न सापडणार मार्ग हे सगळं, अगदीच सुंदर मांडलंय, आई गं ... कित्ती सुंदर !

आधीपासूनच आर्याच्या रुपातुन वावरणारी अगदी समंजस असलेली तन्वी जेंव्हा तेजश्री प्रधान बनून  त्या अन्या उर्फ़ अंकुश चौधरी सोबत गच्चीवर बोलते, तो तिथ रंगवलेला क्षण अगदी क्या बात ! असा आहे.

खरचं नसतात हो शब्द, काही गोष्टींच कौतुक करायला, तिथे डोळे आणि मौनाची भाषाच  समजावी लागते, तो कट्यार काळजात घुसली मधला सदाशिव म्हणतो ना तसं, टाळ्यापेक्षा स्तब्ध, निशब्द करून टाकणारी शांतताच काही गोष्टींसाठी खरी दाद असते. तशीच दाद या सतीश राजवाडे दिग्दर्शित "ती सध्या काय करते ?" या चित्रपटासाठी ...


- भार्गव

टिप : 
1. दारू वाईट असते, तिच्यानी माणसं दुरावतात.
2.हा लेख चित्रपट मनापासून आवडल्याची पावती आहे. हा समीक्षा करण्याच्या हेतूनी काय चूक काय बरोबर यासाठी लिहिलेला लेख नाही.  

No comments:

Post a Comment

Popular Posts