काही क्षणापूर्वी एक ट्विट केलं. जेंव्हा YouTube वरती आर्या आंबेकरनी गायलेलं 'जिवलगा कधी रे येशील तू' हे गाणं ऐकलं. नंतर गाणं जुनंच असल्याचं माहिती असल्यामुळे मूळगायिका, संगीतकार, गीतकार कोण असावेत ? हा प्रश्न पडला. गुगल वरती शोध घेतल्यावर जी नावं पुढे ती वाचून फक्त "येथे कर माझे जुळती" ही भावना मनात आली. कारण हे दिग्गज होते कविवर्य ग.दि.मा.ज्यांना सगळा महाराष्ट्र आधुनिक वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखतो, संगीतकार लवकुशांचा गोड गळा असणारे सुधीरजी फडके आणि ज्यांनी स्वरसाज चढवलाय त्या गायिका आशाजी भोसले. पण काही केल्या आशा भोसले यांची ओळख फक्त गायिका म्हणून करून कशी द्यावी? हा प्रश्न मनात टोचत होता.
स्वरसम्राज्ञी म्हटलं तर तिथे लतादिदी आहेत याची जाणीव झाली. सम्राज्ञी एकचं असते त्यामुळे तो मान, आदर कायम ठेवावा लागतो. तिथे नियम सोडून वागलं तर ती अवज्ञा, तो राजद्रोह. पण, मग आठवलं की , सम्राज्ञी जशी एक असते तशी युवराज्ञी सुद्धा एकच असते, तिथेही आदर, मान-सन्मान असावाच लागतो. तसंच युवराज्ञी ही पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी असते. पुढच्या पिढीच्या प्रतिनिधित्वाची जेंव्हा गोष्ट आठवली तेंव्हा तर मग वय वर्षे ८४ च्या या तरुण आवाजासमोर मला दुसरे आवाज फिके वाटले आणि माझ्या स्वरमंडलांकित सिंहासनावर स्वरयुवराज्ञी आशाजी भोसले विराजमान झाल्या.
.

No comments:
Post a Comment