रंग दे बसंती
काही चित्रपट मनावर ठसा उमटवून जातात त्यातलाच एक म्हणजे 'रंग दे बसंती'
Mr. McKinley उर्फ Steven Mackintosh यांच्या डायरीतली 'भारतीय क्रांतीकारकांची कथा' वाचून थक्क झालेली, झपाटलेली Sue उर्फ Allice Patten भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर चित्रफित काढण्याच्या उद्देशानी भारतात येते. भारतात यायच्या आधीच तिची सोनिया म्हणजेच सोहा आली खान सोबत ओळख असते.
भारतात आल्यावर ती कलाकारांच्या शोधात ऑडिशन घेते. हवे असलेले ताकदीचे कलाकार तिला मिळत नाहीत, शेवटी थकून ती सोनिया सोबत रात्री ओपन थेटरमध्ये येते. इथे तिची ओळख होते आमीर खान, शर्मन जोशी, सिद्धार्थ, कुणाल कपूर यांच्यासोबत. आपल्याला हवं तसं रहाणारे, जगाची पर्वा नसलेले, मस्तमौला मित्र त्यांच्यातलं नातं Sue ला खूप भावतं. ती त्यांनाच आपल्या चित्रपटात काम करण्याची विनंती करते. हो - नाही करता करता चित्रीकरणाला सुरुवात होते, पण अजूनही तिला रामप्रसाद बिस्मिल यांचं पात्र वठवण्यासाठी कलाकार मिळालेला नसतो. तो तिला मिळतो तो लक्ष्मण पांडे उर्फ अतुल कुलकर्णी यांच्या ठिकाणी, जो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो.
DJ ग्रुपचं लक्ष्मण सोबत पटत नसतं. थोड्याशा हाणामारी नंतर हे सगळे एकत्र काम करायला तयार होतात.
यांच्यात नेहमी नसणारा पण यांच्यातलाच एक अजय राठोड म्हणजे आपला आर. माधवन एके दिवशी या दंगेखोर पोरांसोबत फिरायला जातो. तिथेच सोनियाला तो लग्नाची मागणी घालतो. पुढे चित्रपटात नौकरीवर गेलेला भारतीय वायू सेनेतला वैमानिक अजय राठोड विमान अपघातात शहीद होतो. याच्यासाठी कारणीभूत असतो तो संरक्षण मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि विमानाचे दुय्यम दर्जाचे विकत घेतलेले भाग.
एवढं असतांना उद्दामपणे संरक्षण मंत्र्यांनी शहीद अजय राठोड यांना बेजबाबदार म्हणणं DJ आणि त्याच्या ग्यांगला पटत नाही आणि ते संरक्षण मंत्र्यांना गोळ्या घालून ठार मारतात.
यावरही होणारं संरक्षण मंत्र्याच गुणगान ऐकून आपल्या कृत्याची हे सगळे जबाबदारी स्विकारायला सिद्ध होतात, रेडीओवरून आपण केलेल्या कृत्याची कबुली जगासमोर देतात आणि पोलिसांच्या गोळयांच लक्ष बनतात.
चित्रपट पहात असतांना बऱ्याचदा शेवटपर्यंत वाटत रहातं की, वाचलेल्या, अभिनयातून त्या वेळेपर्यंत साकार केलेल्या काकोरी लुट, सोंडर्स मर्डर केस यासारख्या क्रांतिकारकांच्या कथा, त्यात मित्रावर झालेला अन्याय या सगळ्या गोष्टींतून प्रेरणा घेऊन या मुलांनी हे पाऊल उचललं आणि त्यात काही अंशी सत्यता आहे सुद्धा, पण शेवटी रहस्य उलगडतं ते एका वाक्यातून जिथे दाखवलंय की, एक माणूस आंब्याची कोय लावतोय आणि लहानगा भगतसिंग त्या माणसाला विचारतो, "तुम्ही काय करताय ?"
तो माणूस उत्तरतो,"आंब्याची कोय लावतोय ज्यामुळे पुढे अनेक आंबे खायला मिळतील."
आणि त्याच वेळी DJ आणि त्याची ग्यांग त्या मुलावर सावली धरते. हे दृश्य या चित्रपटाचं सार आहे.
याला अनेक अंगांनी बघता येतं त्यातलं एक म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती.
दुसरं, आपल्या क्रांतिकारकांनी केलेल्या जीवाची कोय आता वृक्ष होते अथवा (झाली आहे ) हि भावना. हे सगळं दाखवत असतांना हिंदू - मुस्लीम एकतेवर केलेलं भाष्य तेही नजरेआड करता येत नाही.
किरण राव, अनुपम खेर, वहिदा रेहेमान यांची छोटीशी पण कथेला पूरक असलेली पात्र कथेला परिपूर्ण करतात.
शेवटी काही दिवसांपूर्वी वाचलेली अशफाकुल्ला खान यांची ही कविता ...
© भार्गव हिरवे

No comments:
Post a Comment