Sunday, 6 January 2019

शाल्वी ...


अगदी बिनधास्त,
चार चौघात उठून दिसेल अशी फटाका पोरगी.
जिन्स टॉप, डोळ्यांवर गॉगल, केस मागे फिरवलेले, पायात स्टायलीश शूज, उजव्या हातात, दोन बोटांच्या बेचकीत एक सिगारेट पेटवलेली.
कोण कसं पहातंय, काय बोलतंय याचं काहीच घेण देणं नसेल या पोरीला असं वाटून जाईल एखाद्याला इतकी दिमाखदार चाल ...
एका शब्दात अपमान करण्यासाठीच हिचा जन्म झालायं असं वाटून जावं असं बोलणं असलेली.

हिला पहिल्यांदा पाहिलं ते मुंबईला, लोकलमध्ये. नोकरीच्या शोधात इंटरव्यू साठी मी ठाण्याला गेलो होतो तेंव्हा.
तर घडलं असं, इंटरव्यू झालेला होता, आणि भावाकडे विक्रोळीला जाण्यासाठी मी स्टेशनवर थांबलो होतो.
लोकल आली
मी डब्ब्यात चढलो.
नवीन जागा, आजूबाजूचा परिसर, भाषा - मराठीच असली तरी बोलण्याचा निराळाच ढंग,
लोकांच्या भावनाशुन्य आणि एखाद्या स्त्रीकडे पाहतांना लालचावलेल्या पण तरीही आपल्याकडे कुणी पहात तर नसेल ना ? या भावनेपोटी काहीशा झुकलेल्या नजरा. हे सगळं मी पहात होतो.

तेवढ्यात ती स्टेशनावर आली.
आजूबाजूच्या माणसांना चार सणसणीत शिव्या देत डब्ब्यात चढली.
तिच्या बोलण्याच्या पद्धतीकडे पाहूनच अनेकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यातलाच मीही होतो.
काही आगाऊ मुलांनी थोडी हिंमत करून तिच्याकडे पाहिलं पण एका  जळजळीत नजरेत तिनी त्यांनाही गार केलं.
एकूणच डब्ब्यात भजनं गाणारी मंडळी आणि गाडीचा आवाज सोडता दुसरा कोणताच आवाज नव्हता.
अचानक मला तिनी किती वाजलेत म्हणून विचारलं.
मी वेळ सांगितला.
Oh God ! Today also I'm reaching late at work. ती स्वत:शीच बोलली.
एवढं एक वाक्य पुरेसं होतं मला तिच्याशी बोलायला ...
कुठे काम करतेस ?
तिनी कंपनीच नाव सांगितलं.
ते ऐकून मी चाट पडलो.
एका मोठ्या कंपनीत ती Software Developer होती.
तू कुठे चाललास ?
- भावाकडे विक्रोळीला
इस्ट कि वेस्ट
- वेस्ट
Well, my office is in west too.
इतकं बोलून झालं.
मी गाडीतून स्टेशनावर लोकांच्या रेट्यानी ढकलल्या गेलो.
पण, ती तेवढ्याच दिमाखात उतरली.
बहुतेक दररोजच्या सवयीचा भाग आहे म्हणून असेल कदाचित.
स्टेशनाबाहेर पडलो.
अजूनही आम्ही बोलतच होतो.
एका चहाच्या टपरीवर थांबलो.
मी - तुला उशीर होत होता ना ?
- हो ! जाऊ दे आजची leave टाकते. आता जाऊन तसंही काम होणार नाहीये
- ठीक , चल मी निघतो.
- अरे चहा तर घे !
- तिनी कप पुढे केला.
- मुंबईत इतकी माणुसकी आणि माणसाला इतका वेळ मिळतो हे दुर्मिळच म्हणायचं.
- ती हसली
- खूप दिवसांनी तुझ्यासारखं कोणीतरी भेटलं, वखवखलेली नजर नसलेलं. शांतपणे बोलणारं.
- हसलो.
- असं बोलणाऱ्या सेंटी मैत्रिणी आयुष्यात पूर्वी असल्याने बहुतेक हिला भरपूर बोलायचंय हे माझ्या लक्षात आलं.
- बोल काय बोलायचंय ते.
तिनी तिची सारी हकीकत सांगितली.
एका अतिसामान्य घरातून शिकत शिकत कशी इथपर्यंत पोचली वगैरे वगैरे.
पण तिच्या पेहरावाबद्दल ती काहीच बोलत नव्हती.
शेवटी मीच म्हटलं ,
तुझी गोष्ट आणि तुझा पेहराव यात जमीन आसमान चा फरक आहे तो कसा काय ?
तर म्हणाली -
- मी आधी चारचौघींसारखीच होते, लाजरी - बुजरी कोणाशीही न बोलणारी, साधी, पण असं राहिलं की लोकांच्या नजरा, comments यांचा  जास्त त्रास व्हायला लागला. म्हणून मग खूप प्रयत्नांती हा स्वत:त बदल घडवला. आता लोक फालतू म्हणून टाळतात पण तेही आता सवयीचं झालयं कमीत कमी कोणी खेटायचा प्रयत्न तर करत नाही.
हे सगळं इच्छेविरुद्ध करावं लागतं, असं म्हणत असतांना तिचे डोळे भरून आलेले होते. डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून तिनं डोळ्यांवर गॉगल लावला आणि त्याच स्टाईलनी ती चालत निघून गेली.

ती नजरेआड होईपर्यंत मी तिच्याकडे पहात होतो. शेवटी तिनी हातात दिलेला चहाच्या कपातला थंड चहा मी प्यायलो, कप कचराकुंडीत टाकला. तिनी तिची हकीकत कदाचित याचमुळे मला सांगितली असावी कारण आपण पुन्हा भेटणार नाही हे तिला माहिती असावं.

© भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts