Sunday, 6 January 2019

पटवर्धन काका ...

सायकल हापसणे, म्हणजे काय पहायचे असल्यास आमच्या रत्नागिरीत या हो !
चढावरून सायकल चालवतांना कसा दम लागतो ते कळेल म्हणजे ... माझ्या सायकलवरून रपेट मारून आल्यावर धापा टाकत पटवर्धन काका बोलले.
वास्तविक कोणत्याही चढावर सायकल चालवली तरी दम जेवढा लागायचा तेवढा लागतोच पण आमचे पटवर्धन काका म्हणजे रत्नागिरीच्या कौतुकाची मशालच जणू.
एकदा आमच्याकडे नांदेडला आले होते म्हटलं चला तुम्हाला आमच्या गोदावरीचा रम्य घाट दाखवतो. तर म्हणाले, आम्ही समुद्राच्या किनारी रहाणारे नदी कसली दाखवतोस शिंच्या ...

शेवटी माझा हिरमुसलेला चेहरा पाहून म्हणाले, चल चल नांदेडात येऊन जर गोदेचे दर्शन घेतले नाही तर कसे होईल, तुमच्या नांदेडासच ना रे शिखांची काशी म्हणतात ?
मी मान डोलवली.
तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी रिक्षा घेऊन येतो.
घरात गाडी असतांना रिक्षा कशाला रे आणतोस ?
माझ्या घरी आमची जुनी स्कूटी त्यावर पटवर्धन काका, अगदी कल्पनेच्या बाहेरचं प्रकरण होतं
मी गाडी चालवायला बसलो आणि ते मागे बसले तर घोडं दोन पायांवर उभं राहतं तसं काहीतरी गाडीचं होणार हे पक्कं.ठरलेलंच .
मग,कसतरी गाडी बंद पडलीये असं खोटं नाटं सांगून वेळ मारून न्यायला लागली. आणि
जेंव्हा पटवर्धन काकी ओरडल्या तेंव्हा कुठं पायात विजार घातली नाहीतर बर्मुडा घालूनच निघाले होते.
वरती चाललेलच, आमच्या रत्नागिरीत आम्ही नाई हो विजारी घालून जात समुद्रावर. मी आपला नंदीबैल बनून मान हलवत होतो.
त्यांच्या हो ला हो म्हणत ...
रिक्षा आली मी आणि काका त्यात बसलो,
बंदा घाटावर रिक्षा थांबवली.
काका उतरले.
मी पैसे दिले.
माझं काही म्हणणं नव्हतंच की त्यांनी पैसे द्यावेत म्हणून पण सवयीनुसार आमच्या रत्नागिरीत माझा पाहुणा म्हणून आलास तर तेंव्हा मी देईल हो पैसे रिक्षाचे म्हणाले.
मी हसलो.
मनमोकळं घाटावरून फिरले, तोंडभरून स्तुती केली, त्यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा त्यामुळे मग ओघानंच मला माहिती असलेली गुरु गोविन्द्सिहांची गोष्ट त्यांच्याकडून ऐकली.
अचानक काहीतरी आठवून  म्हणाले, नांदेड म्हणजे मराठवाडाच की रे, आम्ही कधी कधी बातम्यांत पहातो, ४७ - ४८ डिगरी तापमान वाढते  इकडे उन्हाळ्यात म्हणून.
अरेरे ... काय हाल होत असतील नाई ?
पण टेन्शन घेऊ नकोस तुझ्या बापाला सांग उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझा पटवर्धन काका तिकडे रत्नागिरीस जिवंत आहे म्हणावे आणि ये थेट तिकडे ...
माझ्या मित्राच्या अंतुशेठच्या नारळी - पोफळीच्या बागा आहेत तिकडे, काही फणस आहेत. तुला तिकडे नेऊन निसर्गाची एसी हवा आणि फणसाची गरे खाऊ घालतो.
मी कधीही न पाहिलेल्या नारळी - पोफळीच्या  बागा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
मी विचारात गुंतलेला असतांना पाठीवर काकांचा धप्प असा हात पडला, त्या धप्प आवाजानं भानावर आलो, गोवर्धन घाटाच्या बाजूला तोपर्यंत सूर्य अस्ताचलाला टेकला होता.
शेवटी घाट चढून वर आलो, संध्याकाळचे सहा वाजलेले, दर्शनासाठी सचखंड गुरुद्वाऱ्यात पोचलो. मोठ्या भक्तीभावानी काकांनी डोकं टेकवलं.
बाहेर आल्यावर शिऱ्याचा प्रसाद घेतला.
आणि एकच म्हणाले, आमच्याकडे सगळं आहे अगदी शांतता सुद्धा पण त्यातही गांभीर्य लपलंय, पण मनाला हवी असणारी शांतता फक्त इथे मिळाली बघ ...
दिवसभर रत्नागीरीच कौतुक ऐकून पार भंडावून गेलो होतो, शेवटी माझ्या गावाचं कौतुक ऐकलं आणि भरून पावलो.
मग शेवटी  रात्री नऊच्या सुमाराला  मी आणि काका घरी परतलो.

© भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts