वारसा ...
सकाळचे साडे सहा वाजलेले.
बाणेरहुन हडपसरला निघालो होतो.
बस स्टॉप वर येऊन थांबलो.
खिशात हात घातला तर पाकीट होतं, पण त्यात नावालाही पैसे नव्हते.
म्हटलं जवळच कुठेतरी ATM मधून पैसे काढावेत आणि निघावं.
मग गणराज चौकातून पदयात्रा सुरू झाली.
वाटेतल्या सहजासहजी दिसणाऱ्या प्रत्येक ATM वर ट्राय करून झालं.
पैसे निघेनात.
म्हणजे, कोणत्याही ATM मध्ये पैसे नव्हते.
मित्रांकडून घेता आले असते पण तेवढं परत मागे जावं लागलं असतं.
हाच विचार करत असताना मूळ रस्त्यापासून थोडंसं आतल्या अंगाला एक युनियन बँकेचं ATM दिसलं.
तिकडे धावलो.
एक माणूस आत पैसे काढत होता.
नियमाप्रमाणे आमची स्वारी बाहेर इकडे तिकडे दृष्टिक्षेप टाकत सकाळचं सौंदर्य न्याहाळत होती.
पूर्वेला उगवलेला पण उंचच उंच इमारतीने अर्धवट झाकलेला सूर्य, त्यातच त्या सूर्य प्रकाशात सदनिकेच्या गॅलरीत उभा सूर्याची कोवळी किरणं आपल्या मुखकमलावर घेणारा चंद्र वगैरे ...
असो, त्या आतल्या काकांचं पैसे काढून झालं.
आत जातांना त्यांनीच सांगितलं फक्त पाचशेच्याच नोटा आहेत.
मी अडखळलो.
म्हणजे परत सुट्ट्याचे (चिल्लर पैसे) वांधे.
त्यांनी माझी अडचण ओळखली असावी.
त्यांनी विचारलं, किती सुट्टे पैसे हवेत ?
मी बोलून गेलो , पन्नास म्हणून !
त्या माणसानी अगदी सहजपणे चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव न येऊ देता खिशातून पाकीट काढलं आणि माझ्या हातावर पन्नास रुपये ठेवले.
ती मदत घेतांना नकोसं होत होतं.
सकाळी सकाळी कशाला उगीच पन्नास रुपयांचा चुना एखाद्याला.
कारण, नौकरी करायला लागल्यापासून हातात पडणाऱ्या प्रत्येक पैशाची किंमत कळायला लागली होती.
माझ्यासारख्या बहुतेकांचं एकवेळचं जेवण इतक्या पैशात होतं.
आणि हा माणूस कुठल्याही अपेक्षेशिवाय मला पन्नास रुपये देत होता.
मी त्यांचा नंबर मागितला, तो त्यांनी दिला. हे सद्गृहस्थ बाणेरमध्येच रहातात.
हे पैसे मी गुगल पे किंवा paytm नी पाठवतो म्हटलं तर ते दोन्ही मी वापरत नाही असं ते म्हणाले.
मला कळेना यांना पैसे परत कसे करावेत !?
ती ऑकवॉर्ड फीलिंग ओळखून ते एकच म्हणाले, " कधी एखाद्या दुसऱ्या गरजू व्यक्तीला अशीच मदत कर." म्हणजे झालं.
मी फक्त हसलो.
तेही हसले.
शेकहँड, हॅट्स ऑफ करून झालं आणि मी माझ्या आणि ते त्यांच्या रस्त्याला लागले.
मी वळून पाहिलं, अगदी सूर्याची सोनेरी किरणं पाठीवर घेत एक अवलिया त्याच्या ऍक्टिवावर बसून दूर दूर जात होता.
एकप्रकारे, त्याचा हा वारसा शक्य तितक्या वेळी पुढे चालवायची, सांभाळायची जबाबदारी माझ्या हातात सुपूर्द केली होती त्याने, अगदी माझ्याही नकळत.
मी भांबावून गेलेलो, आणि मनात एकच विचार ...
सूर्यकिरणांच्या तेजामुळे हा माणूस उजळून दिसत होता का अशांच्या निःस्वार्थ स्वभावातून सुर्यकिरणांना तेज चढत होतं ?
सुप्रभात, आपला दिवस मंगलमय असो!
© भार्गव
No comments:
Post a Comment