Saturday, 20 April 2019

अनामिका ...

शनिवारची संध्याकाळ ...
दिवसभर उकडलेली शेवग्याची शेंग झालो होतो रूमवर बसून ...
भयंकर कंटाळा आलेला.
म्हटलं फेरफटका मारून यावा.
रूमवरून भटकंतीला निघालो.
तेही सरड्याची धाव कुंपणापर्यंत ही म्हण सार्थ करायचीच या निर्धारानं.
कारण खिश्यात थोडी वेळेआधीच कडकी आलेली.
पायी फिरत फिरत मगरपट्ट्यात पोचलो.
मगरपट्ट्यात ऑक्सिजन झोन आहे.
तिथे जाऊन बसलो.
कारंज्याचे फवारे आकाशातल्या चांदण्या तोडण्यासाठी झेपावत होते अगदी जिलबी स्पर्धेत उड्या मारणाऱ्या लहान मुलांसारखे.
पाहून गंमत वाटत होती.
माझ्यासारखीच आणखीही मंडळी इथे जमलेली.
काही आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आलेले आईबाब.
काही राघू–मैनाच्या जोड्या.
काही मित्रमैत्रिणी, मित्र–मित्र,
काही डोक्याला डाय लावून ”अभी तो हम जवान है” म्हणणारे, आमच्यासारख्या शिंगल्यांना चिडवणारे आजीआजोबा (ते हे वाचणार नाहीत याची खात्री असल्यानं केलेलं हे धाडस)
सगळे जमले होते.
काही येडचाप लेकाचे तिथंही मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेले त्यांना कशाशीच काही घेणं देणं नव्हतं.
मी हे सगळं पहात होतो.
इतक्यात धुक्यातून कोणीतरी चालत यावं अशी ती आली.
तिची मैत्रीण पण सोबत होती.
पण, लडकिने पुरा ध्यान खिंच लिया था मेरा.
सव्वापाच साडेपाच फूट उंची असावी फार फार तर.
लाल टॉप, काळी थ्रीफोर्थ, केस फिरवून क्लचरमध्ये अडकवलेले, सुंदर डोळे, धारदार पण तरीही नाजूक नाकावर तितकाच नाजूक रिमलेस चष्मा घातलेला. कानात कसलेसे डुल अडकवले होते.
एकदम सुटेबल.
एक लडकी को देखा तो ऐसा लगा ... वगैरे वगैरे गाणे आठवायला लागले.
ती मस्तपैकी कारंज्याजवळ गेली. केसांना जखडून ठेवणारा  क्लचर तीनी काढून मैत्रिणीला दिला. केस मोकळे सोडले. पि टी करतांना करतात तसे दोन्ही हात लांब केले. दीर्घ श्वास घेतला. कमळासारखे डोळे बंद केले. तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू उमटलं होतं तेंव्हा. या सगळ्यात एक प्रकारची विलक्षण सहजता होती म्हणून ते अजून सुंदर वाटत होतं.
पाण्याच्या तूषारांनी तिला अगदी हलकं भिजवल. तिचा प्रफुल्लित चेहरा अगदी क्षणभर घायाळ करून गेला. सुंदरच होती ती. तिच्या कोरीव भुवया चेहऱ्यावर जमलेल्या पाण्यामुळे अजून सुंदर दिसत होत्या. कपडेही थोडे भिजले होते पण तिला चिंता नव्हती. थोडावेळ मस्तपैकी कारंज्याचं पाणी अंगावर घेऊन ती तिच्या मैत्रिणी जवळ गेली. जातांना माझ्याकडे पाहून तिनं अगदी हलक्या भुवया वर केल्या, एक स्मित केलं. मी कारंज्याजवळच उभा होतो.
पार भिजून चिंब ...
प्रश्न एकच होता, जास्त भिजलो कशानं ? तिच्या लाघवी स्मित हास्यानं की कारंज्याच्या पाण्यानं.
बोलावंसं वाटलं पण क्षणभरच. तोपर्यंत ती आली तशीच धुक्यात नाहीशी झाली होती.
मी रूमकडे निघालो, अर्धा रस्ता पार केल्यावर लक्षात आलं, अंगावरचे कपडे तर वाळले होते, आणि मी अजुनही चिंब होतो.
पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तरही तिथंच मिळालं.
अनामिका होती ती, स्वप्न होतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं.

© भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts