Saturday, 18 January 2020

पुणे ... कथा एका शहराची

काही शहरांची ओढच इतकी प्रचंड असते की, त्या शहरात पाऊल ठेवायच्या आधीच तिथला वारा आपल्यातून वहात असतो. आपण त्या शहराच्या जणू प्रेमात असतो आणि जेंव्हा त्या शहरात जाण्याची वेळ येते तेंव्हा एक प्रकारचा आपल्याला प्रचंड आनंद झालेला असतो. तिथे गेल्यावर काय करीन आणि काय नाही असं झालेलं असतं. आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालो, त्या गावातल्या रस्त्यांपेक्षा जास्त त्या स्वप्ननगरी चे रस्ते आपल्याला पाठ असतात आणि पाठ नसले तरी ते करतांना कित्येक किलोमीटर गल्ल्याबोळ्यांतून फिरल्यावरही यत्किंचितही थकवा जाणवत नाही.असंच काहीसं घडलं पुण्याबाबत.

इंजिनियरिंग संपलं, आणि नोकरीच्या शोधात मी नांदेडहून पुण्याची गाडी पकडली. “पापी पेट का सवाल!” म्हणून नोकरी तर शोधायची होतीच पण त्यापेक्षा जास्त मन भरून आलं होतं ते, या शहराच्या इतिहासाच्या आठवणीनं. 

इसवी सनाच सतरावं शतक या शहराला कायमस्वरूपी ओळख देऊन गेलं. कारण, या मातीवर शिवरायांचा जन्म झाला. इथच सोन्याचा फाळ जमिनीला लागला आणि पुण्याची माती धन्य झाली. इथच आई भवानीचं साक्षात रूप असलेल्या जिजामाऊलीनं  कसबा गणपतीची स्थापना केली. इथूनच मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. इथेच लाखभराच्या फौजेत शिरून महाराजांनी शास्तास शास्त केली. अखंड हिंदुस्थानभर जिथे चांद तारा मदमस्तपणे चमकत होता तो पहिल्यांदा निखळला तो पुण्यात लालमहालावर आणि, भगवा आणि जरीपटका डौलानं स्वराज्याच्या आकाशात फडकायला सुरुवात झाली. पुढे याच स्वराज्याच्या आकाशानं नवनवी क्षितिजं सर केली आणि हिंदुस्थानभर आपला अंमल प्रस्थापित केला. मग झणाणून उठली डफ, तुणतुणी आणि मर्द मराठ्यांच्या कंठातून अभिमान भरल्या स्वरात पोवाडे, आणि विरश्रियुक्त गीते ऐकू यायला लागली. सामान्य जनताही अभिमानाने म्हणू लागली, “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा”. पुढे पेशवाईचा थाट आणि सत्तेसाठी जीवघेणे खेळ या पुण्याने पाहिले. अख्खी पिढीच्या पिढी पानिपतात कामाला आली पण विजयश्रीनं आपल्या गळ्यात माळ घातली नाही हे शल्यही या शहरानं शंकराप्रमाणे पचवलं. त्यानंतरच्या घडामोडीत दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेतली. पण या शहराचं नशीबच एकूण सत्तेची सूत्र आपल्या हातातून न सोडणारं. कारण, पुढे याच शहरातून भारतीय स्वातंत्र्यलढा लढला गेला, त्याची बहुतेक सूत्रे हलवायची जबाबदारी या शहराकडे होती. कारण इथे होते,“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” म्हणणारे नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. इथेच धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी काम केलं. गोपाळ गणेश आगरकरांसरखे समाजसुधारक इथेच होऊन गेले.“आदी मी, अनादी मी, अवध्य मी भला ...” म्हणणारे क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या चळवळींना दिशा मिळाली ती या पुण्यातूनच. तो दगडूशेठ गणपती, ती तांबडी जोगेश्वरी देवी हे माझ्या गावातल्या देवळांपेक्षा मला कधी जवळचे वाटायला लागले ते कळलं सुद्धा नाही. याच शहराच्या हवेनं अनेकांना घडवलं, त्यात प्रतिवाल्मिकी  गदिमा आहेत, बाबूजी आहेत, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आहेत. अबालवृद्धांचे आवडते लेखक श्री पु लं देशपांडे यांची खूप मोठी कारकीर्द या शहरानं पाहिली. अनेक मोठमोठे नट या शहरानं दिले. अनेकांना पोटपाण्याला लावलं. अशा या शहराची उजळणी करत करत, या साऱ्या घटना आठवत आणि या प्रातःस्मरणीय लोकांच्या आठवणीत माझा प्रवास पूर्ण झाला. सकाळी सहाच्या सुमाराला गाडी स्टेशनला लागली. मी उतरलो. या शहराची पायधूळ मस्तकी लावली आणि स्टेशनातून बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर कुठे जायचं, कोणत्या नंबरची बस पकडायची हे सगळं भावानी आधीच सांगितलेलं होतं. त्यानुसार शिंदे वाहनतळाजवळ पोचलो. इतक्यात कुणी एक बाई लगबगीनं माझ्याजवळ आली आणि तिच्या परडीतलं कुंकू, मला कळायच्या आत माझ्या कपाळावर लावून मोकळी झाली. आणि पैसे द्या म्हणून हात पुढे केला. शेवटी, ते स्वागत अनिच्छेनच स्विकारून मी माझी बस पकडली. त्या क्षणी लक्षात आलं की, आपण एकविसाव्या  शतकातल्या पुण्यात पाय ठेवला आहे.
पुढे, नोकरीच्या शोधात पुण्यातल्या बहुतेक जागी फिरलो. ज्या दिवशी स्वतः तली हिंमत संपत असल्याचं जाणवायचं त्या दिवशी मग शनिवारवाड्याच्या समोर जाऊन बसायचो. तो वाडा म्हणजे शक्तीचा कधीही न संपणारा स्त्रोत आहे. तिथं आज काहीही नाही पण त्याच्या बुरुजांमध्ये आजही समोरच्याला बळ देण्याची ताकद आहे. ती जागाही कुठल्याच मंदिरापेक्षा कमी नाही.
ऐन तारुण्यात आलेल्या पोरांना  जर बुधवार पेठ माहिती नसेल तर नवलच म्हणावं लागेल. मीही या गल्ल्यांबद्दल ऐकून होतो. पुण्यातला एक बदनाम भाग. शहाण्या माणसाने त्या भागातून जाऊ नये म्हणतात, नाही ! लोकांच्या तुमच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलतात. पण एखाद्या गोष्टीवर जर आपण प्रेम करत असू तर त्या गोष्टीला तिच्या गुणदोषांसकट स्विकारायला हवं. तेंव्हा कधी कधी मित्राच्या गाडीवरून त्याही भागातून ऐन मध्यरात्री चक्कर मारली. तिथे पाहिल्या वासनांध नजरा, पिलेली माणसं, समोरच्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आपलं दुःख डोळ्यात लपवत उगीच दातांनी स्वतःचेच ओठ चावणाऱ्या वेश्या. मन सुन्न झालं हे सगळं पाहून. एक भलं मोठं उघड्या दरवाजाचं तुरुंगच आहे ते. या लोकांसाठी समाजाची बंद दारं इतकी जास्त शक्तिशाली आहेत की त्याच्यासमोर तुरुंगाचे पोलादी दरवाजे पण कमी ताकदवान असतील. या बदनाम गल्ल्यांमधून फिरताना,“ यातून सुटका नाही” हेच त्यांच्या नशिबी लिहिलेलं असल्याचं जाणवलं.
या शहरानं जिवाभावाची अनेक नवीन माणसं दिली. अनेक प्रकारची माणसं दाखवली. जशी चांगली माणसं दाखवली तसे वाईट अनुभवही दिले. शहरातल्या शहरात दोन दोन तासांचा प्रवास करतांना सुद्धा वैतागून न जाणं शिकवलं या शहरानं, थोडक्यात काय ? तर या शहरानं संयम शिकवला. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवायचं कसं हे शिकवलं.
फर्ग्युसन कॉलेज, सिंबोईसिस कॉलेजच्या रस्त्यानं फिरताना बदललेल्या काळाची काही कोडी सुटली आणि काही नवीन कोड्यांनी बेचैन करायला सुरुवात केली.
या शहरात जसे मला मोठमोठे क्लब दिसले तसे शहराच्या ऐन मध्यात पाताळेश्र्वरासारखं शांत मंदिरही दिसलं , पार्ट्यांचे निरनिराळे प्रकार दिसले, त्यांच्या नादात वहावत गेलेले लोकही दिसले आणि स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवणारे मित्रही मिळाले.
कपडे बदलले की संस्कृती कशी बदलता येते हे मला या शहरानी शिकवलं. पण, माणसं असो वा शहरं आपलं मुळ विसरत नाहीत हे खरं. याची प्रचिती येते, पुण्यातला शिवजयंती आणि गणेशोत्सव आणि परंपरा पाळणारी नवीन पिढी पाहिल्यावर.
या शहराबद्दल बोलायला श्वास आणि लिहायला शब्द कमी पडावेत इतकं देखणं रूप आहे या शहराचं.
म्हणूनच म्हणत असावेत, “पुणे तिथे काय उणे !”

©भार्गव


No comments:

Post a Comment

Popular Posts