२०१० ची गोष्ट.
मी आणि जीवन नी एकत्रच B.A. ची परीक्षा दिली.
आम्हाला दोघांनाही साहित्याची प्रचंड आवड.
जीवन म्हणजे तर अगदी चालती बोलती कविता.
अतिशय स्पष्ट बोलणारा.
अगदी निर्मळ मनाचा.
जे मनात तेच ओठांवर असलेला.
त्याला बाकिबा, विंदा, कुसुमाग्रज अगदी तोंडपाठ होते.
त्याला आवडायचं या सगळ्या कवींच्या कविता वाचायला.
वाचून दाखवायला.
एकूणच "कविता कशा वाचाव्यात ?" हा जर प्रश्न आमच्या बॅच च्या कोणालाही विचाराल तर, तुम्हाला आजही दोन शब्दात उत्तर मिळेल.
आणि ते म्हणजे "जीवन सारख्या"
अगदी ज्यांना कवितेतलं ओ कि ठो कळत नाही तेही त्याच्या कविता ऐकायला यायचे.
त्यानी वाचलेली वेडात मराठे वीर दौडले सात ही कुसुमाग्रजांच्या विशाखा कविता संग्रहातली वीरश्रीयुक्त कविता तो हृदयनाथांच्या चालीत न गाता कविता वाचून दाखवतात तशी दाखवायचा. पण तो वाचत असतांना बहुतेकांच्या डोळ्यात मला दिसायचे ते प्रतापराव गुजर.
महाराजांचं आज्ञापत्र वाचणारे.
दुखावलेले.
आपल्या निर्णयामुळे स्वतःवर संतापलेले.
आणि रागाच्या भरात शत्रूवर त्वेषाने तुटून पडत स्वतःच्या जीवाची उधळण करणारे.
प्रतापरावांची स्वामिनिष्ठा, कुसुमाग्रजांचे शब्द आणि जीवनच कविता वाचणं. क्या बात !
माझ्यावर त्यामुळे कॉलेज मधल्या फक्त पोरीचं नाही तर पोरंही जळायचे.
म्हणायचे, " लेका त्या जीवन नी तुझ्यात असं काय पाहिलं कि तो तुला इतका भाव देतो ?"
आता पोरांना मी काय सांगणार ?
मी राधी साठी लिहिलेलं पर्सनल लव्ह लेटर वाचून हा माझ्या प्रेमात पडला असं !
एक दिवस संध्याकाळी जीवन कॉलेज वरून घरी जातांना म्हणाला, लेका ! तू मोठा लेखक होणार बघ.
मी चेष्टेवारी घेत त्याला म्हणालो,
अन तू तुझ्या बापासारखी आयुष्यभर रुक्ष अशी पोस्टमनची नोकरी करणार बघ.
ज्यात सगळ्या जगाची गुपितं तुझ्या हातात असतील पण तुला त्यातलं काहीच कळणार मात्र नाही.
मग तो आणि मी दिलखुलास हसलो.
एका वळणावर त्याचा आणि माझा रस्ता वेगळा झाला. तो त्याच्या नि मी माझ्या घराकडे वळालो.
कोणाला माहीत होतं ? माझे शब्द इतके पटकन खरे होतील.
त्या दिवसानंतर जेमतेम चार दिवसात बातमी आली.
जीवनचे वडील एकाएकी वारले.
घरात मोठी लग्नाला आलेली बहीण.
आई, दहावीला शिकणारा भाऊ.
एकाएकी घराची जबाबदारी जीवनवर पडलेली.
त्यानी वडिलांच्या जागी पोस्टमनची नोकरी स्वीकारली.
त्या एकाच घटनेनं असं बरंच काही झालं होतं ज्याची कधी कोणीच कल्पना केली नव्हती.
आमचा एक मित्र जो आम्हाला दररोज कविता वाचून दाखवायचा तो आता लोकांची नावं आणि पत्रांवरचे पत्ते तेवढे वाचणार होता.
लोकांचा आनंद आणि दुःख आपल्या झोळीतून वाटत फिरणार होता, या गल्लीतून त्या गल्लीमध्ये ...
कधी कधी भेटायचा त्याच्या खाकी पोशाखात, घरी जाता जाता माझ्या घरी घटकाभर थांबायचा ...
जगभरच्या गप्पा मारायचा. त्याच्या नौकरीतल्या गोष्टी सांगायचा. आणि त्याच्याबद्द्ल थोडंसं काही विचारलं कि परत एकदा कुसुमाग्रज त्याच्या तोंडात यायचे ...
कधी म्हणायचा,
समिधाच सख्या ह्या त्यात कसा ओलावा ?
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा ?
जात्याच रुक्ष ह्या ...
पुढचं त्याला पाठ होतं, पण बोलायचाच नाही ...
मग मीच म्हणायचो ...
जात्याच रुक्ष ह्या, एकच त्या आकांक्षा,
तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा ...
तर कधी कधी विषय टाळण्यासाठी मोठयानी हसायचा, खांद्यावर हात ठेवायचा आणि माझ्याकडे पाहात म्हणायचा ...
भावी लेखक महोदय तुम्ही
फक्त लढ म्हणा ...
आणि कडकडून मिठी मारायचा डोळ्यातून घळघळा पाणी वाहायचं त्याच्या. मला शब्द सापडायचा नाही. पण त्याच्या पाठीवरून तेंव्हा फिरणाऱ्या माझ्या हाताला त्याची जबाबदारी कळायची.
No comments:
Post a Comment