Monday, 25 September 2017

कधी भरून वाहतो, कधी रिकामा असतो ...

कधी भरून वाहतो, कधी रिकामा असतो
कधी उदासवाणा, कधी स्वच्छंदी हसतो
कधी ऐकत बसतो फक्त शब्दांना मी
कधी स्वरांमध्ये मी आकंठ डुंबून जातो ...

कधी बागडणाऱ्या मुलांमध्ये भोवतीच्या
कधी विनासक्त उडणाऱ्या पाखरांच्या
कधी वाऱ्यासंगे खेळणाऱ्या नभांमध्येही
मी हरवलेले लहानपण शोधत असतो  ...

वहीवाटत असता रस्ता आयुष्याचा
मी वेचित जातो सडा इथे रत्नांचा
कुणी मागत असल्यास, मुक्त मनाने देतो
तो संपण्याऐवजी पुन्हा भरून वाहतो ...

मी संध्याकाळी एकरूप होऊनी
मी नदीकिनारी गुणगुणत असतो  गाणी
गाणे ऐकून माझे सूर्य गुलाबी होतो
भेटण्या मला वात लाटेला घेऊन येतो ...

मी मनात घेऊन स्वप्नांची शिदोरी
मी वाट आक्रमीत जातो पंढरपुरी
अन पाहतोच जेंव्हा विटेवरी पांडुरंगाला
तो क्षणात विठोबा अद्वैत साधत जातो ...

©भार्गव हिरवे



.



No comments:

Post a Comment

Popular Posts