बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट मनात आहे, काहीतरी भन्नाट लिहायचं, लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. मनाला समाधान देणारं, उर्जा देणारं, अंधारातून तेजोमय प्रकाशाकडे घेऊन जाणारं, मनाला एकाच वेळी अस्वस्थ आणि शांत करणारं, एकाच वेळी विचारांचं काहूर आणि निरव भयावह शांततेतही मनाला ओढ लावणारं. त्या काहीतरीचा शोध लेखणी घेत होती, हात फुरफुरत होते. शब्द अव्यक्त स्वरूपात मनाच्या गाभाऱ्यात दडून बसले होते. ज्याप्रमाणे शिवशंकराने भागीरथीला आपल्या जटांत बांधून ठेवले होते अगदी त्याचप्रमाणे.
माझ्या मनाला याही गोष्टीचं मोठं कोडं वाटतं की, कोणता विचार कधी कुठे आणि कसा रुजतो ? एखाद्या विषयाची ओढ का वाटावी ? आपण खाऊन पिऊन सुखी असतांना, जगात पेटलेल्या संघर्षाची काडी इतकीही स्वतःला झळ पोचत नसतांना मनानी इतकं बेचैन का व्हावं ? राष्ट्र, धर्म, ध्वज ही कुणीही न सांगता आपली स्वत:ची ओळख कशी बनावी ? कोण गांधी ? कोण नेहरू ? कोण राजगुरू - भगतसिंह - सुखदेव - बटुकेश्वर दत्त - रामप्रसाद बिस्मिल - चंद्रशेखर आझाद ? कोण टिळक - आगरकर - सावरकर ? कोण तो अनंत कान्हेरे आणि कोण तो मदनलाल धिंग्रा ? पुस्तकातून यांच्या ओळखी झालेल्या. यांच्यापैकी कुणाचाही वैयक्तिक संबंध नसतांनाही आपण यांचे खरचं कुणीतरी आहोत असं मनातून का वाटावं ? पुण्याच्या रस्त्यावरून गणेशखिंड भागातून जातांना का परत परत चाफेकर बंधू आठवावेत ? का फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीत फिरतांना मागून टिळक आवाज देतील का वाटावं ? का ? या एकाच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी घेऊन येत आहे क्रांतीसमिधा या लेखमालिकेतून काही ज्ञात- अज्ञात क्रांतिकारकांच्या गोष्टी ...
- भार्गव हिरवे
No comments:
Post a Comment