Monday, 4 September 2017

स्टारडम ...

मागच्या काही महिन्यांपासून पुण्यात आलोय. पुण्यात आल्यावर आपण एका ऐतिहासिक नगरीत पाऊल ठेवतोय याची जाणीव माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाला होत असेल तर त्यात काही वावगं नाही असं मला वाटतं. पुण्यात येऊन जेंव्हा हिंजवडीसारख्या भागात रहायला आलो तेंव्हा आतोनात आनंद आणि दु:ख झालं. आनंद याचा की माझ्या घरातून दिसणारे डोंगर, हिरवळ पुण्यात दिसणं शक्य नाही आणि दु:ख याचं की ज्या पेठेतल्या पुणेकरांचे तिखट गोडवे मी ऐकलेले होते त्यांचे ते कौतुकाचे शब्द मला या भागात ऐकायला मिळणार नव्हते. पण शिकवणीच्या निमित्ताने का होईना आता मी पेठांच्या जवळ जातो. अगदी अस्सल नाही तरी काही प्रमाणात पुणेरी ठसका डेक्कन भागात भरतो. 



                          

हे सगळं याच्यासाठी सांगायचं की, डेक्कनला जातांना मला दररोज बालगंधर्व आणि संभाजी उद्यानचा परिसर लागतो आणि मी या परिसराच्या अगदी प्रेमात पडलोय. तिथे बसायला केलेली जागा, तिथली हिरवळ मला माझ्या हिंजवडीच्या घरातल्या इतकाच आनंद देते. इथून जातांना दररोज काही क्षण पावलांची गती मंद होते, कॉलेजचे ग्रुप, म्हातारे आजी-आजोबा, एखादा उनाड मित्रांचा समूह मस्ती करतांना, मुली खिदळतांना दिसतात, कुणी एखादा एखादं बेफाट पुस्तकं हातात घेऊन बसलेला असतो. कुणी राघू-मैनाच्या गप्पा करतांना दिसतं.

मग हे सगळं पहात असतांना उगीच एक विचार मनात येऊन जातो, आणि स्टारडम बद्दल असणारी ओढ किंवा आपणही काहीतरी भारी असावं, अगदी प्रसिद्ध (अर्थात सुप्रसिद्ध ) याबद्दलची ओढ कुठेतरी कमी व्हायला लागते. वाटतं की, आपण कदाचित जर फेमस असतो तर आपण आपल्या आयुष्यातून या छोट्या छोट्या गोष्टीतला किती आनंद हरवून बसलो असतो. कधी हे असं मनमोकळं जगताच आलं नसतं. वाटलं तिथे थांबा, ज्या ठिकाणी वाटलं तिथे पाणीपुरी खा, गाडीचा कंटाळा आला तर  पायीच चालत जा, जिथे पाय कुरकुर करायला लागतील तिथून जवळचा बसस्टॉप शोधा आणि परत आपल्या घरी , कुठली बंधनं नाहीत, अगदी स्वच्छंदीपणानी अगदी त्या बागेतल्या फुलपाखराप्रमाणे फिरायचं. अगदी झेडब्रिजवरच्या कावळ्यांची कावकाव पण गमतीदार वाटू लागते. ट्राफिक सिग्नल वरून रस्ता क्रॉस करतांना अर्ध्यातून सिग्नल सुटलं की दुसरी बाजू गाठायला होणारी धडपड ही या सुप्रसिद्ध कलाकारांच्या वाट्याला कुठे यायला. प्रसिद्ध होण्याआधी जगलेलं हे जग बऱ्याच जणांना परत खुणावत असेल नाही ? असं उगीच वाटायला लागतं. खरचं आपल्या देशात किंवा कुठेही या सुप्रसिद्ध कलाकारांना जर सामान्य माणसासारखं जगता आलं तर, अर्थात लोकांनी जगू दिलं तर कित्ती मज्जा येईल ?
माझ्यासारखा एखादा माणूस जसं एखादं गाणं गुणगुणत रस्त्यावरून फिरतो, तसचं उद्या शंकर महादेवन मूड मध्ये एखादी ओळ आपल्या स्वत:च्या आनंदासाठी गाऊन जाईल. आजूबाजूच्या मैत्रिणींच्या फार आग्रहावरून एखादी आर्या भाव खात एखादी ओळ गाऊन दाखवेल. एखादा अभिनय  उगीचच आपल्या केसांतून हात फिरवत आपल्या बाजूनी गेलेला असेल. दिलीप प्रभावळकरांसारखा दिग्गज नट कुठेतरी बागेत फिरतांना दिसेल. अगदी मनमोकळेपणानी. हे सगळं तितक्याच सहजपणे व्हायला हवं. एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मान देणं, त्यांच्या कलेचं कौतुक वाटणं त्यांच्याबद्दल प्रेम वाटणं हे स्वाभाविक आहे पण आपल्या प्रेमाच्या अतिरेकामुळे त्या कलाकारांना त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी.

बऱ्याच दिवसांपासून हा विषय लिहायचं मनात होतं आज मानसी परांजपेंची पोस्ट वाचली आणि सुचत गेलं ...

- भार्गव हिरवे

No comments:

Post a Comment

Popular Posts