गजर झाला ..
शालिनी उठली , एका मोठ्या कंपनीत मॅनेजर, उत्कृष्ट चित्रकार, उत्तम कविता लिहिणारी, खेळांमध्ये आवड असलेली आणि दररोज नियमित व्यायाम करणारी सुस्वरूप ती ...
चार वर्षांपूर्वीच तिचं मंदारशी लग्न झालं, तोही मोठा देखणा स्वकर्तुत्वाने कुठल्याशा आय टी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर, फिट अँड फाईन ...
एकूण पाहिलं तर अगदी दोघंही एकमेकांना अनुरूप, लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणावा असे.
आर्थिक सुबत्ता, स्वतःचा एका मोठ्या सोसायटीत तीन बीएचके फ्लॅट, आई-वडिलांसारखी माया करणारे सासू सासरे, सर्व कसं अगदी छान चाललं होतं.
दोघांचीही वयं आता 30-32 च्या आसपास.
साधारण दिड वर्षापूर्वी शालिनी आणि मंदारनी आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. कालानुक्रमे ' दोघांत तिसरा आला.'
सगळीकडे उत्साहाचं वातावरण, शालिनीचे आईवडील आणि सासुसासरे एकदम खुश ! आपल्या नातवासोबत खेळत खेळतच त्यांचा दिवस सुरू होई आणि मावळेसुद्धा. पहाता पहाता सहा महिने उलटले, शालिनीची मॅटर्निटी लिव्ह संपली.
आणि, आता कसरत सुरू झाली ... करियर आणि मातृत्वाची ... दोन्ही आघाड्यांवर सरस ठरून तिला इथेही आदर्श घालून द्यायचा होता.
आतापर्यंत करियरच्या आघाडीवर संसार करत असतांना शालिनीला मंदारनी चांगली साथ दिली होती. ती तशाच प्रकारच्या साथीची अपेक्षा बाळाच्या संगोपनातसुद्धा करत होती. घरातली एकूणच पुरुषी मानसिकता म्हणा किंवा काहीही, पण मंदार बाप म्हणून शालिनीच्या अपेक्षेला उतरत नव्हता.
तिच्या मातृत्वाचा रथ एकाच चाकावर चालत होता पण ते आपल्या बाळासाठी साधत असतांना तिला मोठी कसरत करावी लागत होती.
सुरुवातीचे काही महिने तिनं मंदारला वेळ द्यायचं ठरवलं, म्हणून मग ती आपला उत्साह टिकवून ठेवत दोन्ही आघाड्यांवर दोन हात करत राहिली. एकदाही नाराजीचा सूर न लावता, हसतमुखानं.
तशात तीन-चार महिने उलटले, बाहेर ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप, मंदारचं बाप म्हणून सपशेल अपयशी ठरणं, आणि आपल्या लहानग्या बाळाच्या संगोपनाकडे लक्ष देणं यामुळे आताशा तीची चिडचिड होऊ लागली.
तिच्या चिडचिडीच कारण समजून न घेता , मंदारही अधिकाधिक काळ घराबाहेर राहू लागला. यातून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
तशातच एका रविवारी, घरात सासुसासरे, मंदार नसतांना दुपारी घरातल्या सोफ्यावर बसल्या बसल्या तिचं लक्ष तिनंच काढलेल्या दिवाणखाण्यातल्या पारिजातकाच्या चित्राकडे गेलं आणि पूर्वीच्याच हुरूपानी तिनं तिचं चित्रकलेचं साहित्य बाहेर काढलं आणि मनसोक्त चित्र काढायला सुरुवात केली, तिचं नऊ- दहा महिन्याचं बाळ आजूबाजूला रांगत होतं, खेळता खेळता त्यानं शालिनीच्या पायाशी रंगांचे ब्रश बुडवून ठेवलेला पाण्याचा जग सांडवला आणि सांडलेल्या पाण्यात त्यानं हात मारायला सुरुवात केली. काही रंगांचे थेंब त्या बाळाच्या चेहऱ्यावर लागले. त्यावर मोहून जाऊन अगदी काही वेळात आपल्या लाडक्या सोनूल्याचं शालिनीनं हुबेहूब चित्र काढलं. मग आपल्या बाळाला उचलून तिनं त्याचे कपडे बदलले आणि त्याला चित्र दाखवलं, ते सोनूलं खुदकन हसलं, त्याच्या हसण्यात, खेळण्यात, त्याला झोपवण्यात संध्याकाळ कधी झाली ते शालिनीलाही कळालं नाही. संध्याकाळी मंदार घरी आला, बसल्या बसल्या त्याचं लक्ष सहजचं कोपऱ्यातल्या चित्राकडे गेलं, पुढे बराच वेळ तोही त्यात रंगून गेला, मागे शालिनी उभी असल्याचंही त्याच्या लक्षात आलं नाही. तिनं त्याला आपल्या नाजूक हातांनी मिठीत घेतलं. त्यानं हळूच आपली मान वळवली, दोघंही एकमेकांमध्ये गुंतत जात होते इतक्यात बेडरूममधून ट्याहांव ट्याहांव आवाज आला आणि मंदार शालिनीची पाशातून स्वतःला सोडवून घेत बेडरूमकडे धावला. ही त्याची कृती शालिनीला विलक्षण समाधान आणि हुरूप देऊन गेली.
एखादं विणकाम करत असताना अचानक दोरा हातातून सुटावा, एक एक गाठ सुटत जावी आणि कष्ट मातीमोल होण्याआधी तो सावरण्यात यश यावं तसंच झालं. शालिनी आणि मंदारचा संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला नव्हे पूर्वीपेक्षा अधिक रुजला , खुलला, बहरला ...
आणि एकमेकांच्या साथीनं त्यांनी करियर आणि मातृत्वाच्या दोन्ही आघाड्यांवर विलक्षण यश मिळवलं.
आता त्यांच्या दिवाणखान्यात त्या पारिजातकाच्या चित्राऐवजी त्यांच्या मुलाचं शालिनीनं त्यादिवशी काढलेलं चित्र लावलंय, ज्यावरच हास्य कधीच सुकणार नाही म्हणून ते जीवापाड मेहनत घेतायेत.
- © भार्गव
07/21/2018
No comments:
Post a Comment